नंदुरबार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश यात्रा २१ ऐवजी २२ तारखेला सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहे. तसेच त्यांची शहादा शहरातील आयोजित सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती नंदुरबार भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली.
मुख्यमंत्री गुरुवारी दुपारी धुळ्यात पोहोचतील. मोठा मारुती येथे त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर अंधारे चौक, जुनी नगरपालिका, भाजप जिल्हा कार्यालय, नेहरू पुतळा, बस स्थानक मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या यात्रेचे सभेत रूपांतर होणार आहे. यात्रेनिमित्त जाहीर सभेत मुख्यमंत्री नंदुरबारच्या जनतेला संबोधित करणार आहे, सभेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपचे महामंत्री सुरजीत ठाकूर आदी उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या महा जनादेश यात्रेत जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेतेमंडळीही भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.