नंदुरबार - पोल्ट्री फॉर्ममधून कोंबड्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून टेम्पोसह सव्वा ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनवर हल हक शेख समीर (रा.मुजावर मोहल्ला, नंदुरबार), जावेद शाह आरीफ शाह (रा. मन्यार मोहल्ला), मोहिनोद्दीन सलाउद्दीन काझी (रा.घोडापीर मोहल्ला), संतोष मंगल ठाकरे (रा.तलावपाडा, नंदुरबार) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी शिवारात कासीम कयुम खाटीक यांच्या मालकीच्या पोल्ट्री फॉर्ममधून २६७२ कोंबड्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी कासिम खाटीक यांच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या चोरी झाल्याने पोल्ट्री फॉर्म व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कोंबड्या चोरांना जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपासाला सुरुवात केली.
नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या सर्व शहरातील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत होती. गुजरात राज्यातील सोनगड येथील टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत असताना २० ते २५ वाहने गुजरात राज्यात जातांना दिसून आली तर, यामधील १० वाहने ही संशयास्पद आढळली. या वाहनांच्या आधारे नंदुरबार येथील अनवर शेख समीर यास एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेऊन विचारपूस केली. अनवर समीर याने खामगांव शिवारातून पोल्ट्री फॉर्ममधून कोंबड्या चोरी करून अहमदाबाद येथील कोंबड्यांचे व्यापारी असलम नवाब खान रईम खान पठाण याच्याकडे विक्री केल्याचे सांगितले.
हेही वाचा - 300 गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'टीपू'चे निधन; शासकीय इतमात अंत्यसंस्कार
पथकाने कोंबड्या चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली टॅम्पो (क्र.जी.जे.16 झेड. ८९८२) जप्त केली. कोंबड्या चोरीप्रकरणी जावेद शाह आरीफ शाह (रा. मन्यार मोहल्ला), मोहिनोद्दीन सलाउद्दीन काझी (रा.घोडापीर मोहल्ला), संतोष मंगल ठाकरे (रा.तलावपाडा, नंदुरबार), अनवर हल हक शेख समीर (रा.मुजावर मोहल्ला, नंदुरबार) यांना ताब्यात घेतले. तसेच कोंबड्या विक्रीचे १ लाख ८३ हजार रुपये व टेम्पो असा एकूण ७ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हवालदार रविंद्र पाडवी, सजन वाघ, महिला पोलीस नाईक पुष्पलता जाधव, पो.कॉ.बापू दंगल, दादाभाई मासुळ, पो.कॉ.अविनाश चव्हाण, मनोज नाईक, शोएब शेख यांच्या पथकाने सदर कारवाई केली.
हेही वाचा - भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; धुळे-सूरत महामार्गावरील घटना