नंदुरबार - महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणजे अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग. या मार्गावरील गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागातील सद्गव्हान येथील पूल धोकादायक झाला असून अपघातांचे केंद्र बनला आहे. पूलावरील सिमेंट उखडले असून लोखंडी गज बाहेर निघाले आहेत.
पुलाच्या मधोमध खड्डे पडले असल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. वाहनचालक या पुलावरुन जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. या पूलावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने हे खड्डे अजून मोठे होत आहेत.
पूल सीमावर्ती भागात असल्याने याची देखभाल दुरुस्ती गुजरात राज्य करणार की महाराष्ट्र हा प्रश्न आहे. या पुलाची देखभाल दुरुस्ती झाली नाही तर हा पूल कोणत्याही वेळी वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जर पुलाची वेळेत दुरुस्ती झाली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यामध्ये अलीकडील काळात पूल कोसळण्याच्या दुर्घटना वाढल्या आहेत. पुलांच्या ऑडिटमधील हलगर्जीपणाही यासाठी कारणीभूत ठरत आहे. या जर पूलाची लवकर दुरुस्ती केली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. प्रशासनाने राज्यात नुकत्याच घडलेल्या पूल दुर्घटनांमधून धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे.