नंदुरबार - नागपूर-धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद झाला आहे. नवापूर तालुक्यातील रायंगण गावाजवळील पूल शुक्रवारी चार वाजता पावसामुळे तुटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
एक अवजड ट्रक पुलावरून जाताना येथे अडकला आहे. सुदैवाने या घटनेत ट्रकचालक बचावला. ट्रकच्या मागून येणारे रायंगण गावातील दोन मोटरसायकलस्वारही तुटलेल्या पुलावर पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुलावर अडकून असलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा असे आवाहन नवापूर तहसीलदार सुनीता जराड यांनी केले आहे. पुलाची पाहणी करून तहसीलदारांनी महामार्ग प्रशासनाला घटनेची माहिती दिली.
गेल्या दीड वर्षांपासून हा महामार्ग खराब अवस्थेमुळे चर्चेत आहे. महामार्गाच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली. या महामार्गावरून रोज हजारो अवजड वाहने जात असतात. मात्र पूल तुटल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे.