नंदुरबार - जनगणना आणि स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण याबाबत सरमिसळ करून राजकारण करू नये. विजय वेड्डटीवार (vijay wadettiwar) यांनी आधी सर्वोच्च न्यायालयाला ओबीसींचा डाटा तीन महिन्यात द्यावा, आम्ही आघाडी सरकारचे स्वागत करू. अन्यथा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी दिला आहे. येथील भाजपा आढावा बैठकीत ते बोलत होते.
'चौकशीचे अडथळे'
राज्यातील महाआघाडी शासनाने जलयुक्तच्या कामांची कुठल्याही संस्थेमार्फत खुशाल चौकशी करावी, मात्र जलयुक्तचे काम महाआघाडी सरकारला करायची नाही. त्यांना या योजनेला पैसा द्यायचा नाही, म्हणून असले चौकशीचे अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे. राज्यातील जलयुक्त शिवार योजनांची सीबीआय, सीआयडी कोणामार्फतही चौकशी करा, मात्र या योजनेतील उर्वरीत काम व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्वरीत करा, असे त्यांनी सांगितले.
'अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर टीका'
राज्यात सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असल्याने आपले प्रत्येक अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करत आहे. नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. मात्र राज्य सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. ओबीसी आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेले आहे.