नंदुरबार - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नवापूर नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील प्रभाग क्रमांक ६ अ मधून काँग्रेसच्या सुरेखा प्रकाश जगदाळे तर, प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपचे महेंद्र अशोक दुसाणे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या सुरेखा जगदाळे यांना 843 तर, भाजपचे दुसाणे यांना 984 मतं मिळाली. त्यामुळे या पोटनिवडणुकीत काँग्रेस व भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.
हेही वाचा - फिजिक्स स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स विषयाची पुनर्परीक्षा १४ जानेवारी रोजी
नवापूर नगरपालिकेच्या प्रभाग सहा अ व सात अ मधील तत्कालीन दोन सदस्यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने नवापूर पालिकेच्या दोन्ही प्रभागांची पोटनिवडणूक जाहीर केली. त्यानुसार 29 डिसेंबरला मतदान तर, सोमवारी 30 डिसेंबरला मतमोजणी प्रक्रिया घेण्यात आली. शहरातील सुरुपसिंग नाईक नगर भवनात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. 11 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाल्याने निवडणुकीचे निकाल लागले.
प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये काँग्रेसच्या सुरेखा प्रकाश जगदाळे, भाजपच्या जिग्नेशा संदीप राणा, अपक्ष उमेदवार फेमिदा फिरोज फॅन्सी यांच्यात तिरंगी लढत झाली. तर, प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेनेचे डॉ. मनोज रमेश चव्हाण, भाजपचे महिंद्र अशोक दुसाणे तर अपक्ष उमेदवार सुनील धाकू भोई, गणेश भानुदास वडनेरे यांच्यात चौरंगी लढत झाली. मतमोजणीतून आलेल्या निकालानुसार प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये काँग्रेसच्या सुरेखा प्रकाश जगदाळे यांना 843 मते मिळून विजयी झाल्या. काँग्रेसच्या जगदाळे यांनी भाजपच्या जिग्नेशा राणा यांचा 121 मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या जिग्नेशा संदीप राणा यांना 722 मतं व अपक्ष उमेदवार फेमिदा फिरोज फॅन्सी यांना 34 मते मिळाली आहेत.
प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचे महेंद्र अशोक दुसाणे हे 984 मतांनी विजयी झाले असून शिवसेनेचे मनोज चव्हाण यांचा 225 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचे डॉ.मनोज रमेश चव्हाण यांना 759 मते व अपक्ष उमेदवार सुनिल धाकू भोई यांना 36 मतं तर अपक्ष उमेदवार गणेश भानुदास वडनेरे यांना 116 मतं मिळाली आहेत. पालिकेच्या या पोटनिवडणुकीत एक जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळाली आहे. यावेळी काँग्रेस व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापले उमेदवार विजयी झाल्याने ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. मागील पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही प्रभागातील जागांवर काँग्रेसचे सदस्य निवडून आले होते. परंतु, या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एक जागा गमवावी लागली आहे. तर, भाजपचे पक्ष बलाबल एका संख्येने वाढले आहे.