नंदुरबार - अंगणवाडी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. त्यात एक अंगणवाडी सेविका, एक मदतनीस, लहान बालके व त्यांच्या माता असतात. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शेवटच्या टोकावर असलेल्या मांडवा येथे गेल्या 35 वर्षांपासून करमसिंग वडवी हे अंगणवाडी कार्यकर्ता आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावीत आहेत. स्वतःच्या घरात व परिवारातील सदस्यांना त्यांनी ज्या अंगणवाडीच्या सेवेत रुजू करून घेतले आहे. पाहूया एक खास रिपोर्ट...
35 वर्षांपासून अंगणवाडी कार्यकर्ते म्हणून कार्यरत
आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भाग असलेल्या नर्मदा काठालगत असलेल्या मांडवा गावाचे हे आहेत. करमसिंग पोहल्या वळवी. ४८ वर्षीय करमसिंग वळवी हे मांडवा गावात अंगणवाडी सेवक म्हणून कार्यरत आहे. सातपुडा पर्वत रागांमध्ये बसलेल्या या भागात कसेबसे पोहोचता येते. त्यामुळेच ३५ वर्षांपुर्वी शासकीय यंत्रनेतील काही लोक याभागात अंगणवाडी चालवण्यासाठी माणासांचा शोध घेत होते. त्यावेळेस नदीवर पोहायला गेलेले करमसिंग वडवी त्यांना भेटले. त्यावेळची चौथी पास आणि लिहता वाचता येत असल्याने त्यावेळेपासून करमसिंग वळवी हे अंगणवाडी सेवक झालेत.
शासनाच्या प्रत्येक सुविधा, आहाराची ते माहिती देतात
अक्कलकुवा तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकावर असलेल्या मांडवा अंगणवाडीत आज करमसिंग वळवी यांच्या मांडवा अंगणवाडी अतंर्गत १ ते ०६ वयोगटातील ८१ बालक, १० गरोदर माता, १४ स्तनदा माता आणि ५९ किशोरी मुली आहेत. आज गावातल्या स्त्रीया लहान बालके आणि किशोरी मुली या करमसिंग यांच्याकडे आवर्जून बैठकीस येतात. शासनाच्या पोषण आहारासोबतच अनेक योजनांची माहीती कमरमसिंग वळवी त्यांना देतात. त्यामुळे महिला अंगणवाडी सेविकांचे काम आजही पुरुष म्हणून करमसिंग वळवी लिलया करत आहे.
पत्नी व मुलींनी दिली साथ
खऱ्या अर्थाने स्त्रीयांशी निगडीत असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करायचे आणि त्यात करमसिंग वळवी पुरुष यामुळे स्त्रीयांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी संवाद कसा होणार, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. मग अशावेळी त्यांच्या अर्धांगीनी आणि त्यांच्या घरातील त्यांच्या मुली या त्यांच्यासोबत राहील्या. अनेक प्रश्नांवर महिला किशोरींसोबत चर्चा करुन त्यावर समाधान मिळाले. यामुळे करमसिंग वळवींचे कामही सोपे झाले. मुळातच अंगणवाडी अंतर्गत येणारे सारेच लाभार्थी हे याच अतिदुर्गम भागात राहणारे त्यामुळेच स्थानिक भाषेतून शासन उपक्रमासोबत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात करमसिंग वळवी यांना अडचण आली नाही. असे त्यांच्या मुली सांगतात.
स्वतःच्या घरात भरवितात अंगणवाडी
याहून भन्नाट बाब म्हणजे मांडव्याची ही अंगणवाडी आजही करमसिंग वळवी यांच्या घरातच भरते. सध्या कोरोनाकाळ आहे. त्यामुळे बालके आणि महिला येत नाही. मात्र गेली पस्तीस वर्षे यांच्या घरात अनेक बालकांचा किलबिलाट राहिला. घरातल्या अंगणवाडीत येणारे हे सारेच परिसरातले असल्याने आणि करमसिंग वळवी यांच्या मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या सोबतच्यांचे अनेक मुले आज अंगणवाडीत येत असल्याने वडील यातून सामाजीक कार्य करत असल्याने त्याचा आनंद द्विगुणीत झाला. मात्र घरच्यांनाही कधी घरात भरणाऱ्या अंगणवाडीचा कंटाळा आला नाही. विशेष म्हणजे घरात भरणाऱ्या अंगणावाडीचे भाडेही करमसिंग यांच्या परिवाराने शासनाकडून घेतले नाही. गावात आता नवीन अंगणवाडी बनत आहे. त्यामुळे त्याचे सुख असले तरी आगामी काळात अंगणवाडी घरात भरणार नाही, याचे दु:ख देखील असल्याचे करमसिंग वळवी यांचे कुटुंबीय सांगतात.
जिल्ह्यात चार अंगणवाडी सेवक म्हणून कार्यरत
विशेष म्हणजे करमसिंग यांच्याप्रमाणे तब्बल 11 जण जिल्ह्यात कधीकाळी अंगणवाडी सेवक म्हणून भरती झाले होते. आज त्यांच्यासह फक्त 04 पुरुष जिल्ह्यात अंगणवाडी सेवक म्हणून काम करत आहे. त्यातही करमसिंग पुरुषांमध्ये वरिष्ठचा आहे. राज्यभर अंगणवाडीचा गाडा हा महिला अंगणवाडी सेविकांमार्फत हाकल्या जात असतानाच नंदुरबारच्या जांगठी, केवडी, सांबर आणि मांडवा या अतिदुर्गम भागातल्या अंगणवाडीचा कारभार तब्बल 35 वर्षांपासून पुरुषीमंडळींकडून चालवल्या जात असल्याने ही बाब राज्यात भन्नाटच म्हणावी लागेल.
हेही वाचा - मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्लूएसच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार; राज्यसरकारचा आदेश