नंदुरबार - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयातील दाखल आणि दाखल होण्यापूर्वीची सुमारे 710 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात आली. तसेच दीड कोटी रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली आहे. यामध्ये फौजदारी दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणांसह विद्युत थकबाकी, पाणीपट्टी थकबाकी ही प्रकरणे निकाली काढण्यात आली.
नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात 14 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.टी. मलिये यांच्या उपस्थितीत लोक अदालतीमध्ये दाखल झालेली प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात आली.
हेही वाचा - चेतक महोत्सवामध्ये १ कोटींची उलाढाल, यंदा नवा विक्रम यंदा होण्याची शक्यता
यावेळी पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश ए. एस. भागवत, दिवाणी न्यायाधीश एल. डी. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी बी. जी. चव्हाण, सहदिवाणी न्यायाधीश एस. ए. विराणी यांनी पॅनलप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांना मदतीसाठी अॅड. ए. बी. सोनार, अॅड. विनया मोडक, अॅड. ए. आर. राजपूत, अॅड. एन. आर. गिरासे, अॅड. के. एच. सावळे, अॅड. उमा चौधरी, अॅड. मसुदा शेख यांच्यासह विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एन. डी. चौधरी यांनी काम पाहिले.
या लोकअदालतीमध्ये एकूण 710 प्रकरणे सादर करुन ती सामंजस्याने मिटविण्यात आली. यामध्ये 1 कोटी 57 लाख 81 हजार 318 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. न्यायालयात दाखल असलेल्या दिवाणी प्रकरणांमध्ये 27 प्रकरणे निकाली काढून 6 लाख 3 हजार 955 रुपयांच्या रकमेची वसुली, मोटार अपघात प्रकरणात 23 प्रकरणे निकाली काढुन 74 लाख 96 हजार रकमेची वसुली, धनादेश अनादर प्रकरणात एकुण 40 प्रकरणे मिटवुन 14 लाख 99 हजार 449 रुपये रक्कमेची वसुली करण्यात आली.
हेही वाचा - खांडबार्यात दुकानांना आग; युवकांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात
तसेच कौटुंबिक वादाची 8 प्रकरणे, फौजदारी वादाची 8 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर न्यायालयात दाखल होण्यापूर्वी बँक वसुलीसंदर्भातील 61 प्रकरणे मिटवुन 57 लाख 67 हजार 756 रकमेची वसुली झाली. वीज थकबाकी वसुली प्रकरणी 18 प्रकरणे निकाली काढुन 79 हजार 240 रकमेची वसुली झाली. पाणीपट्टी, घरपट्टी थकबाकी संदर्भातील 506 प्रकरणे निकाली काढुन 3 लाख 34 हजार 918 रुपये इतकी रक्कम वसुल करण्यात आली आहे.