नंदुरबार - रजाळे येथील 66 वर्षीय कोरोनाबाधिताच्या संपर्कातील नातलगांसह 18 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच, गाव पाच दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील लोकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. तर, सदर बाधित रुग्ण तत्पूर्वी नंदुरबार शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी गेल्याने रुग्णालय सील करुन डॉक्टरासह कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे मुंबई येथून आलेल्या एका 66 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. हा बाधित मुंबईहून ठिकठिकाणी टप्प्याने प्रवास करीत रजाळे गावात आला होता. गुरुवारी रात्री अहवाल प्राप्त होताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी रजाळे येथे पोहोचले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. आर. तडवी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. पोलिसांकडून गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर, संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. बाधिताच्या संपर्कातील लोकांची माहिती व सर्वेक्षणाचे आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. सदर बाधिताच्या पाच नातेवाईकांसह 18 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एक नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
मुंबईहून रजाळे येथे येण्यापूर्वी त्यांना जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचा सल्ला आरोग्य विभागामार्फत देण्यात आला होता. गावातील नागरीक आधीच सतर्क होते. मुंबईहून आलेला वृद्ध बाधित झाल्याचे समजताच ग्रामस्थांना धक्का बसला. ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यानंतर गावात रात्रभर भीतीचे वातावरण होते. सरपंच पाटील व आरोग्य सेवक महेंद्र घुगे यांनी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. तेथे तपासणी करुन घरी पाठविण्यात आले होते. त्यानंतर बाधिताला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेले. तपासणीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी बाधिताला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्याच्या सूचना देऊन नमुना तपासणीसाठी पाठविला.
गुरुवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वच प्रशासन कामाला लागले. गावात ग्रामपंचायतीकडून निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. तसेच खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने बाधित व्यक्तीचा रहिवास परिसर सील केला आहे. तसेच, सावधगिरी म्हणून पाच दिवस रजाळे गाव संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामस्थांनी घरी रहावे, असे आवाहन सरपंच, पोलीस पाटील यांनी केले आहे.