नंदुरबार - जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ब्राह्मणगाव ते खापर रस्त्यावर एका गाडीने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या गाडीचा पाठलाग करत होते. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी संबंधित गाडीमध्ये दारूगोळा असल्याच्या संशयावरून गाडीचा पाठलाग करत होते. त्यामुळे गाडीचा चालक घाबरला होता. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून तीन जणांना गंभीर जखमी केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ज्या गाडीचा पाठलाग करत होते त्या गाडीत कुठल्याही प्रकारचा दारू साठा आढळून आला नाही. मात्र, संशयावरून सुरू असलेले हे पाठलाग नाट्य अनेक जणांचा जीवावर उठले असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करत असताना रस्त्यात येणाऱ्या दोन पोलीस ठाण्याला या संदर्भात का माहिती दिली नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अपघातानंतर खापर पोलीस चौकीला मोठा जनसमुदाय जमा झाला होता. संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. या अपघाताप्रकरणी गाडी चालकाच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मोटर अपघात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.