नंदुरबार - जिल्ह्यातील सुमारे 25 पोलीस कर्मचारी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. बंदोबस्त आटोपल्यानंतर कर्मचारी जिल्ह्यात परतले असून त्यांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नसली तरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मालेगाव येथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे स्थानिक पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होत असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना मालेगाव येथे पाचारण करण्यात आले होते. पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्याची काळजी घेता नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त आटपून परतलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पोलीस दलातील 25 पोलिसांना मालेगाव येथे बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नंदुरबार पोलीस मालेगावात बंदोबस्तासाठी तैनात होते. बंदोबस्त आटोपल्यानंतर 25 पोलिसांचे नंदुरबार येथे आगमन झाले. दरम्यान, नंदुरबार येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मालेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. सुमारे शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असून नवीन रुग्णांची भर पडत आहे.