नंदुरबार - जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शिरसानी गावातील लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडींना घेऊन भुजगाव येथे परत जात असताना महिंद्रा पिक-अप (क्रमांक एम एच २० - ३७६३) या वाहनाला अपघात झाला. या अपघातात १ ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
वऱ्हाडींना घेऊन भरधाव वेगाने परत येत असताना चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली. त्यामुळे गाडीतील प्रवासी बाहेर फेकले गेले. मात्र, दिलीप बिजलाल पावरा (वय १३ रा. तलावडी ता, शहादा) हा गाडी खाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला. या अपघातात गाडीतील १६ जण जखमी झाले. जखमींना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १२ जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय नंदुरबार येथे पाठवण्यात आले आहे.