नांदेड - शिवसेनेचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आजपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या स्वागताची जोरदारी तयारी सुरु असून, यानिमित्ताने त्यांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गुरुवारी सायंकाळी चार वाजता त्यांचे उदगीरहून मुक्रमाबाद येथे आगमन होणार आहे. तेथे त्यांचे स्वागत होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता देगलूर, बिलोली विधानसभा मतदारसंघात मोंढा मैदानावर आमदार सुभाष साबणे यांनी आयोजित केलेल्या सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत. नंतर नरसी येथे रात्री आठ वाजता त्यांचे स्वागत होईल आणि रात्री नांदेड येथे मुक्कामी राहतील.
2 ऑगस्ट रोजी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड दक्षिण मतदारसंघात त्यांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी साडेदहा वाजता मोहनपूरा बेटसांगवी येथे त्यांचे आगमन होईल. त्याठिकाणी उद्घाटन सोहळा आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे अकरा वाजता सोनखेड येथे स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता त्यांची लोहा येथे सभा होणार आहे. तर दुपारी दीड वाजता ते पालममार्गे परभणी जिल्ह्यात रवाना होतील.
३ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता ते वसमत मार्गे अर्धापूरला येतील. तेथे त्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात येईल. त्यानंतर वारंगाफाटा मार्गे बामणी फाटा येथे पोहोचतील. तेथेही त्यांचे स्वागत करण्यात येईल. हदगाव, हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात दुपारी अडीच वाजता ते हदगावला पोहोचतील. हदगाव येथे त्यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळावा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ते दुपारी चार वाजता निवघा येथे पोहचतील.
या सर्व कार्यक्रमांना शिवसैनिकांनी, शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे आणि आनंदराव बोंढारकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.