नांदेड : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नमस्कार चौकात असलेल्या MH-26 हॉटेल चालकाचा आणि युवकाचा दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला. तो वाद तेथेच मिटल्यानंतर शनिवारी सायंकाळी तो युवक पुन्हा हॉटेलमध्ये आला. त्या दोघांचाही वाद चिघळल्यानंतर युवकाने जवळील खंजीर बाहेर काढले. जिवाच्या भितीने हॉटेल चालक भररस्त्यावर इकडे तिकडे पळू लागला. शेवटी तो जीव वाचविण्यासाठी माणिक पेट्रोल पंपाच्या कॅबिनमध्ये घुसला. तेथे झालेल्या मारामारीत हॉटेल चालक जखमी झाला. हॉटेल मालकावर सध्या नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना सीसीटीव्हीत कैद : हॉटेल चालकावर वार करणारा युवक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. हल्ला करून तो बसने फरार झाला आहे. ही घटना समजताच विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
नांदेडमध्ये चालले तरी काय ? उपसरपंचपदाच्या निवडीनंतर आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी 19 जानेवारी, 2023 रोजी विजयी मिरवणूक काढली. यात 'आमचा नेता पॉवरफुल्ल' गाण्यावर थिरकताना प्रतिस्पर्ध्यांवर जरब बसावी यासाठी त्यांनी मिरवणुकीत तलवारी नाचवल्या. बरं प्रकरण एवढ्यावरही थांबले नाही तर गावगुंडांनी एकाला रक्त निघेपर्यंत मारहाणही केली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनूला या गावी घडली.
दहशत पसरवण्याचा प्रयत्न : सरपंच पदासाठी आमच्या उमेदवाराला मतदान का केले नाही? असे म्हणत एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नूतन उपसरपंचांसह नऊ जणांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मिरवणुकीत विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी नाचवून अप्रत्यक्ष दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
हातात तलवारी घेऊन डान्स : उपसरपंचपदी विराजमान झाल्यावर मिरवणूक काढण्याकरिता संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी जाळावर तलवारींच्या पाती गरम करुन त्या नाचवण्यास तरुणांनी मागे पुढे पाहिले नाही. हा सगळा प्रकार सुमारे २० मिनिटे सुरू होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद आणि वादावादी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. कुठे दोन पॅनल तर कुठे तीन पॅनलमध्ये लढती झाल्या. मात्र, निवडणुकीतील खुन्नस आता काढली जात आहे. हदगाव तालुक्यातील मनूला या गावात असाच प्रकार घडला आहे.
हेही वाचा : Thane Crime : कपड्याच्या आडून बनावट विदेशी मद्याची तस्करीचा पर्दाफाश; लाखोंचे मद्य जप्त