नांदेड - मुलीच्या जन्माचे कौतुक करत, ज्या मातांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे, त्यांचा सत्कार करण्यात आला. गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांच्या हस्ते या मातांना साडी-चोळीचा आहेर देत, त्यांचा सत्कार घेण्यात आला. शामनगर येथील महिला रुग्णालयात हा कार्यक्रम पार पडला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, 'कन्या प्राप्त मातांचा सन्मान' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात जेवढ्या धुमधडाक्यात आजही मुलाच्याच जन्माचे कौतुक केले जाते. तशा पद्धतीने मुलीच्या जन्माचा मात्र गाजावाजा नसतो. वर्तमानपत्रात आपण आजही वाचतो कि 'नकोशी' असलेली कचऱ्यात फेकली गेली. मात्र, देशाच्या उज्वल भवितव्यासाठी मुलगा-मुलगी समान मानून सारख्याच पद्धतीची वागणूक दोघांना द्यायला हवी.
मुलीच्या जन्माबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. हाच धागा पकडून युवासैनिक बालाजी पाटील मैद यांच्या वतीने, राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून, 'कन्या प्राप्त मातांचा मान, साडी चोळी देवून सन्मान' हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी साडी-चोळी सोबत सर्वच प्रसुती झालेल्या महिला रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
ज्या घरात अगोदरच २ किंवा ३ मुली आहेत व परत मुलगीच झाली आहे. अशा घरातील महिला सुद्धा मुलगा झाला नाही म्हणून नाराज होतात. अशा मातांसोबत राजश्री पाटील यांनी संवाद साधून त्यांच्यामध्ये जनजागृती करत मुलीच्या जन्मानंतर शासन राबवत असलेल्या 'माझी मुलगी, माझा सन्मान', 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', 'सुकन्या समृद्धी योजना', 'प्रधानमंत्री मातृवंदन योजना', 'माझी कन्या भाग्यश्री' आणि 'राजश्री योजना' अशा योजनांची माहिती दिली. मुलगी नको म्हणून जे दाम्पत्य गर्भलिंग चाचणी करतात, अशा लोकांसाठी शासन करत असलेले कठोर कायदे व त्यांना होणारी शिक्षा याबद्दलही माहिती देऊन जनजागृती केली.
यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष जयवंत कदम, युवासेना तालुका प्रमुख, गजानन कदम, तालुका संघटक, नवनाथ काकडे, बालाजी पाटील मैद, युवासेनेचे साई विभुते, शिवाजी पावडे, राम कासारखेडेकर, आकाश कदम, गणेश धडके, अनिल बुक्तरे, संगमेश्वर पालिमकर, गोरखनाथ खरबे, प्रियेशसिंग राजपुत, डॉ.भारत संगेवार, डॉ. लता पवार आणि शिवसैनिक उपस्थित होते.