नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर आणि माहूरचे नगराध्यक्षपद यावेळी महिलांसाठी राखीव होते. मात्र, येथील उनगराध्यक्षपदीही महिलांचीच निवड करण्यात आली आहे. अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या समीरा बेगम तर उपनगराध्यक्षपदी डॉ. पल्लवी लंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच माहूर नागरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या शितल जाधव आणि उपनगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या अश्विनी पाटील यांची चिट्ठी काढून निवड करण्यात आली आहे.
अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुमेरा बेगम यांची तर उपनगराध्यक्षपदी डॉ. पल्लवी लंगडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांनी शनिवारी केली. निवडीची घोषणा होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष केला.
नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज आल्यामुळे नगराध्यक्षपदी सुमेरा बेगम शेख लायक यांची तर उपनगराध्यक्षपदी डॉ. पल्लवी लंगडे यांची करण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी दुपारी विशेष सभा घेण्यात आली. या सभेला काँग्रेसचे सर्व नगरसेवक व 1 अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. तर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमचे नगरसेवक गैरहजर होते.
माहूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल मेघराज जाधव यांची ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अश्वीनी आनंद पाटील यांची निवड करण्यात आली. नगरपंचायत सदस्यामधून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक इलियास बावानी, राष्ट्रवादीचे रहमत अली, एमआयएमच्या शारिफाबी अजीज या तिन्ही मुस्लिम नगरसेवकांनी भाजपच्या दिपाली नाना लाड यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे लाड यांन 8 तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या शीतल मेघराज जाधव यांनाही 8 मतदान मिळाल्याने पीठासीन अधिकारी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ईश्वर चिठ्ठीने निवड करण्याचा निर्णय घेतला.