नांदेड - भविष्यात कोरोना गेला तरी कारोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आललेल्या लाॅकडाऊनने देशात आर्थिक आणीबाणी येण्याची शक्यता आहे. त्या परिस्थीतीत शेती करणे अवघड होणार आहे. खते, बियाणे, औषधे, औजारे व अन्य वस्तू यांची भाव वाढ होऊन शेतऱ्याला आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच बोगस खते व बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे शासनाने याबाबत सतर्कता ठेवून बोगसगिरी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी संभाजी बिग्रेडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तर व्यापाऱ्यांनी बोगसगिरी केल्यास त्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईल धडा शिकवू, असा इशाराही संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी दिला आहे.
हेही वाचा- COVID-19: मुदत संपलेली वाहनांची कागदपत्रे वैध समजली जाणार - केंद्रीय वाहतूक मंत्रालय
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागणार आहेत. पेरणीसाठी लागणारा पैसा उभा करण्याचे आव्हान शेतकऱ्यासमोर आहे. आर्थिक आणीबाणीत बॅका शेतकऱ्यांना दारात उभे राहू देणार नाहीत. शेतकऱ्यांकडे असलेला शेतीमाल व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने खरेदी केली आहे. सध्याला हळद, ज्वारी, तूर, हरभरा, केळी तसेच फळे व भाजीपाला शेतात तयार आहे. मात्र, विक्रीसाठी सध्या अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलगडले असून शेतकऱ्याला खरिपाची तयारी करायची आहे. त्यासाठी मोठा खर्च होतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः कडील बी-बियाणे वापरावीत स्वतःकडे नसतील तर नातेवाईक किंवा इतर शेतकऱ्यांकडून घेऊन ठेवावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच व्यापाऱ्यांनी जर बोगसगिरी केली तर त्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईलने धडा शिकवू असा इशाराही गव्हाणे यांनी दिला आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी निवेदन देऊन सरकारने यावर्षी खते बियाणे यामध्ये चढ्या भावाने विक्री होणार नाही व बोगसगिरी होणार नाही यासाठी आत्तापासून विशेष व्यवस्था निर्माण करण्यास संबंधितास आदेशित करावे, पेरणीसाठी सरकारने एकरी पाच हजार रुपये तातडीने मदत करावी, बॅकांनी नवीन कर्जदार शेतकरी व थकबाकीदार शेतकरी यांना एकरी 10 हजार रुपये तातडीने कर्ज मंजूर करुन वाटप करावे, शेतीमालावर विनाव्याज तारण कर्ज द्यावे, अशा मागण्या केल्या आहेत.