नांदेड - आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने दहावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. लक्ष्मीबाई साखरे या महिलेला तीन मुले आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली होती. त्यामुळे तीन मुलांना वाढविण्यासाठी लक्ष्मीबाईंनी अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्यासाठी भोई फाउंडेशनने लक्ष्मीबाईंना मदत केली. त्यातून त्या आता 42 टक्के गुण घेऊन दहावी पास झाल्या आहेत. आपण स्वतः शिकणार असून, मुलांनाही शिकवणार असल्याचा निर्धार लक्ष्मीबाईंनी व्यक्त केला.
आता रडायचे नाही, आता शिकायचे व उत्तीर्ण व्हायचे. अशा दृढविश्वासाने दहावीची परीक्षा दिलेल्या लक्ष्मीबाई साखरेंच्या यशाने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. तीन वर्षापूर्वी पतीने नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती. हे संकट कुटुंबावर आले असताना त्यांनी खचून न जाता आपल्या चिमुकल्यांचा अभ्यास घेत स्वतःही अभ्यास केला. त्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत यशसंपादन करून नव्या शैक्षणिक पर्वाला सुरुवात केली आहे. तिच्या यशामुळे एक नवीन पाऊलवाट निर्माण झाली असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला पुण्यातील शंकरराव भोई फाऊंडेशनने शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेऊन पुण्यजागर प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक मदत देण्यात येते. यंदा कोंढा येथील (ता. अर्धापूर) येथील रूपेश व वैभव कदम हे चांगले गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या तीन विधवा पत्नीने दहावीची परीक्षा दिली. तालुक्यातील धामदरी, मालेगाव व अर्धापूर येथील शेतकऱ्यांच्या पत्नींनी मोठ्या जिद्दीने परीक्षा दिली. या तिघी शैक्षणिक प्रवाहापासून दूर गेल्या होत्या. त्यांना व त्यांच्या कुटुंबाला शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम भोई फाऊंडेशनने केले. अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे यांच्या पतीने कर्जबाजारी कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांना तीन मुले आहेत.
आपले कुटुंब सांभाळत व मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देत त्यांनी यंदा सतरा क्रमांकाचा अर्ज भरून दहावीची परीक्षा दिली. त्यांना पुण्याचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक अनिल गुंजाळ, डाॅ. मिलिंद भोई, शिक्षण तज्ज्ञ अर्चिता मडके, डाॅ. वैभव पुरंदरे यांचे मार्गदर्शन लाभले, तर नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सतत प्रोत्साहन दिले.
लक्ष्मी साखरे यांच्या यशाची वार्ता कळताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गटशिक्षण अधिकारी गंगाधर राठोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष नागोराव भांगे, सचिव गुणवंत विरकर, मुख्याध्यापक डॉ. शेख, शेख साबेर यांनी लक्ष्मी साखरे यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
"मी शिकेन व मुलांनाही शिकवीन"
मला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. लग्न झाल्यावर शिक्षणात खंड पडला. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्यामुळे आमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट कोसळले. मात्र, दु:ख गिळून कुटुंब सावरले. मुलांचा अभ्यास घेत स्वत: अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत यश मिळाल्याने माझी नवीन शैक्षणिक पहाट सुरू झाली. मी शिकेन व मुलांही शिकविन असा माझ संकल्प केला आहे. यासाठी भोई फाऊंडेशनच्या पुण्यजागर प्रकल्पाचे सहकार्य मिळत आहे अशा भावना लक्ष्मी साखरे यांनी व्यक्त केल्या.