नांदेड- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी आता कोण विराजमान होणार ? कुणाला संधी मिळणार ? याची चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहे. येत्या आठवडाभरात ही निवड होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीचे विद्यमान सभापती फारुख अली यांच्यासह आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन आठपैकी काँग्रेसच्या सात सदस्यांची निवड नुकतीच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. भाजपचा विरोधी पक्षनेता कोण ? हे अजून ठरले नसल्याने स्थायी समितीतील भाजपच्या एका सदस्यांची नियुक्ती राहिली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे महापालिकेत आणि स्थायी समितीतही दांडगा बहुमत असल्याने काँग्रेसचाच सभापती होणार हे निश्चित आहे. स्थायी समितीत १६ सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे १५ आणि भाजपचा एक सदस्य आहे. काँग्रेसच्या सदस्यांमध्ये अमितसिंह तेहरा, दिपाली मोरे, शबाना बेगम नासेर, बापूराव गजभारे, नागनाथ गड्डम, ज्योती रायबोले, अपर्णा नेरलकर, श्रीनिवास जाधव, फारुख हुसेन, अब्दुल रशिद, पूजा पवळे, राजेश यन्त्रम, दयानंद वाघमारे, करुणा कोकाटे आणि ज्योती कल्याणकर यांचा समावेश आहे. या १५ सदस्यांपैकी एकाची सभापती म्हणून निवड होणार आहे.
सभापतीपदासाठी अमितसिंह तेहरा, दयानंद वाघमारे, पूजा पवळे, अब्दुल रशीद, फारुख हुसेन आदींची नावे चर्चेत असून अंतिम निर्णय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण घेणार आहेत. सभापती निवडीचा कार्यक्रम औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडून जाहीर करण्यात येतो आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया पार पडते. येत्या आठवडाभरात ही निवड होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- पैशासाठी विवाहितेसह २ चिमुकल्यांचा खून, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल