नांदेड - येत्या आठवड्यापासून आसना नदीतून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. इसापूर धरणातून एक दलघमी पाणी नांदेडच्या उत्तर भागातील नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे नांदेडकरांची उन्हाळ्यात तहान भागणार आहे.
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या केवळ ३१ दलघमी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा आणखी ६५ दिवस पुरणार असा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये. यासाठी आयुक्त लहुराज माळी यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. त्यानुसार इसापूर प्रकल्पातूनही पाणी मागविण्यासंदर्भात चर्चा झाली. याची माहिती कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली.
गेल्या २ वर्षांपासून इसापूर धरणाचे पाणी उत्तर नांदेडला दिले जात आहे. इसापूर प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडून ते पार्डी नाल्यातून आसना नदीत सोडले जाते. आसना नदीतून पाईपलाईनद्वारे काबरानगर येथील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात आणण्यात येते. यावर्षी ६ पाणी पाळ्यामध्ये पाणी देण्यात येणार आहे. आसना नदीत १ दलघमी पाणी आल्यानंतर ते २५ दिवस पाणीपुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे.