नांदेड - केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्यांना जागे करण्यासाठी (८ डिसेंबर) आजचा 'भारत बंद' महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.
यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभुमीवर नांदेड शहरातील व तालुक्यातील प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग घ्यावा. असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कायद्याविरोधात बंदची हाक देण्यात आली असून सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावी, यासाठी बाजारपेठेत फिरुन आवाहन करण्यात आले.
'भारत बंद'ला अण्णा हजारेंचा पाठिंबा-
केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर देशभरातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आठ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे. स्वामिनाथन आयोग, केंद्रीय कृषी मूल्य आयोग यांच्या शिफारशी मान्य कराव्यात आदी मागण्या करत अण्णांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
कृषी कायद्याविरोधात आघाडीची भूमिका दुटप्पी- फडणवीस
केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात भाजप विरोधी आघाडीने भारत बंदची घोषणा केली आहे. यावर भाजप नेत्यांनी तीव्र आगपाखड केली. शेतकरी कायद्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच २०१० साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनीच या कायद्याची शिफारस केली असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
हेही वाचा- कृषी कायद्याविरोधात आघाडीची भूमिका दुटप्पी, पवारांचीच कायद्याला शिफारस - फडणवीस यांचा घणाघात ...