नांदेड - विष्णूपुरी जलाशयातून लोहा-कंधार तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे लोहा-कंधार तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत होता. पण गतवर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्व लघू-मध्यम प्रकल्प काठोकाठ भरली होती. या कारणाने मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवली नाही.
जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातील शेतीला आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विष्णूपुरी धरणाची निर्मिती झाली असली तरी अलीकडच्या काळात पावसाच्या लहरीपणामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांवर 'धरण उशाला अन् कोरड घशाला' असे म्हणण्याची वेळ आली आहे. गतवर्षी या धरणांतून पिकांसाठी फक्त एकदा पाणी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी चोरीचे प्रमाणही वाढले होते. पाणी चोरी रोखताना प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाली होती.
विष्णूपुरी जलाशयात मे महिन्याच्या अखेरपर्यंत २३ दलघमी उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. नांदेड शहराला दरमहा ३ दलघमी पाण्याची गरज आहे. लोहा- कंधार तालुक्यातील पिकांची परिस्थिती पाहता तातडीने शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यावर दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, आमदार. बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक पार पडली.
शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्या निर्णयानुसार पाणी सोडण्यात येत आहे. या भागातील शेकडो शेतकऱ्यांना सलग १० दिवस पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. दरम्यान, याआधी या भागातील शेतकऱ्यांना एक दिवसाआड मोटारीने पाणी उपसा करण्याची मुभा होती.
पाणी उपसा करण्यासाठी अखंडित वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. सलग १० दिवस शेतीसाठी पाणी देण्यात येणार असून शहराच्या पाणी पुरवठयावर याचा परिणाम होणार नाही. दरम्यान, पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यात हवामान खात्याने यंदा सरासरीइतका पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजाने नांदेडकर सुखावले आहेत.
हेही वाचा - पीक कर्ज मागणीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 6 जून पर्यंत मुदतवाढ
हेही वाचा - नांदेडमध्ये आतापर्यंत १०३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी; शनिवारी एका रुग्णाची भर!