नांदेड - कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत सुमारे 1 हजार 860 व्यक्तींचा मृत्यू झाला असून यातील प्रत्येकाच्या कुटुंबियांसह ज्यांना लहान मुले आहेत त्यांच्यावर आलेली वेळ सांभाळणेही आव्हानात्मक आहे. ज्या मुलांचे पालक यात गेले आहेत त्यांना सावरण्यासाठी, त्यांची काळजी व संरक्षण देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कामे तात्काळ होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अशा बालकांची माहिती विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी यात सहभागी झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी केवळ नोकरीचा भाग म्हणून याकडे न पाहता पालकांच्या भावनिक ओलाव्यातून यासाठी तत्पर झाले पाहिजे, या शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली.
कृतीदलाची बैठक संपन्न -
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त सुनिल लहाने, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी तथा या समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते.
जिल्ह्यात 1 हजार 860 जणांचा मृत्यू -
जिल्ह्यात आजवर कोरोना अर्थात कोविड-19 मुळे 1 हजार 860 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबांवर जी काही शोककळा पसरली आहे, त्याचा विसर संबंधित यंत्रणांनी कधीही पडू दिला नाही पाहिजे. यात मुलांचा विषय हा भावनिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टींनी अत्यंत आव्हानात्मक आहे.
अनाथ मुलांपर्यंत शासकीय योजना तात्काळ पोहोचवा -
जिल्ह्यात अशी अनाथ मुले असतील तर त्यांच्यापर्यंत शासकीय योजना तत्काळ पोहोचाव्यात यासाठी एका मिशन मोडवर सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून काम करणे अपेक्षित असल्याचे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले.
कोरोनाने आजारी असलेल्या कुटूंबातील मुलांचीही काळजी घ्या -
शून्य ते सहा वर्षांच्या वयोगटातील बालकांचे पालक जर कोविडने आजारी असतील, अशावेळी त्या बालकांची काळजी घेण्यास कुटुंबातील कोणी व्यक्ती नसेल तर अशा बालकांची व्यवस्था शिशूगृहात केली जाणार आहे. याबाबत शासनाने आदर्श कार्यपद्धती निर्गमित केली आहे.
काही अडचण आल्यास येथे संपर्क करावा -
शून्य ते 6 वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे 6 ते 18 गटातील मुलींसाठी सुमन बालगृह नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी- 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा.