नांदेड - कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र शहरातील काही भागांमध्ये निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याची माहिती महापालिकेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या पथकाने शनिवारी सकाळी शहरातील जुन्या नांदेड भागात बरकी चौक, मनीयार गल्ली येथील सात दुकानांना सील केले आहे.महापालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईला न जुमानता व्यवसायिक सर्रासपणे आपली दुकाने सुरू ठेवत आहेत.
पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न
महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने शनिवारी सकाळी आयुक्त लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंग संधू, डॉ.रइस, डॉ. बेग, रमेश चौरे, पोलीस निरिक्षक नरवाडे यांच्या पथकाने जुन्या नांदेडातील बरकी चौक, मनीयार गल्ली, जुनेगंज या भागात पाहाणी केली. पाहाणीदरम्यान त्यांना येथील काही दुकाने सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या, मात्र काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न करता महापालिका पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका पथकाने नांदेडमधील सात दुकाने सील केली आहेत.
महापालिकेकडून सात दुकाने सील
जुन्या नांदेडमध्ये अनेक व्यवसायिक कोरोना नियमांचे उल्लंघन करून, आपली दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहेत. अशा दुकानदारांना अनेकवेळा सांगून देखील ते ऐकत नसल्याने, अखेर अशा दुकानदारांवर महापालिकेच्या पथकाने शनिवारी कारवाई केली. या कारवाईत 7 दुकाने सील केली असून, त्यांना दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा - World Red Cross Day Special : मानवी दुःखाचा परिहार करणारी 'रक्तदान चळवळ'