नांदेड - अशोक चव्हाण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत तोंडावर आपटले होते. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू नये, असा अजब सल्ला विनोद तावडे यांनी दिला आहे.
भाजपच्या मीडिया रूमच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते नांदेडला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अशोक चव्हाण पराभूत झाले होते. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची समजून निवडणुकीला सामोरे जाऊ नये. मी मित्र या नात्याने अशोक चव्हाण यांना सल्ला देत आहे, असे ते म्हणाले. भोकरच काय, तर राज्यातील २८८ पैकी कुठेही ते उभे राहिले तरी ते पराभूत होतील, असा दावा तावडे यांनी केला आहे.
हेही वाचा - काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा शिरकाव; अशोक चव्हाणांची पुन्हा एकदा सत्त्वपरीक्षा....!
सेना भाजपची युती नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 'लाव रे तो व्हिडीओ'वर करमणूक कर लावणार असल्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात अल्पसंख्याक विभागाला निवडणुकीत स्थान देणार असल्याचे ते म्हणाले. तावडे यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी लोकांनी हडपल्याचा आरोप यावेळी केला आहे. या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, खासदार प्रताप पाटील, आमदार तुषार राठोड, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.
हेही वाचा - अशोकराव आता तुमचं काय होणार?