नांदेड - पैनगंगा नदी पात्रामुळे हदगाव आणि उमरखेड तालुक्यातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे हदगांव तालुक्यातील मनुला आणि विदर्भातील पळशी या गावातील नागरिकांनी लोकसहभागातून पैसे जमा करत पैनगंगा नदीवर पूल बांधला आहे.
14 दिवसांत जमवले 15 लाख 80 हजार -
पैनगंगा नदीच्या हद्दीवर हदगाव तालुक्यात मनूला हे गाव आहे. तर विदर्भातील उमरखेड तालुक्यात पळशी या गावातील नागरिकांनी एकत्र येत वर्गणी जमा केली. या दोन गावाच्यामधून पैनगंगा नदी वाहते. या नदीवर पूल नसल्यामुळे या दोन्ही गावच्या नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांसह शेतकरी व इतर नागरिकांना जवळपास 45 किलोमीटरचा फेरा मारून मराठवाड्यात व विदर्भात यावे लागत होते. या पुलासंदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून दाद मिळाली नाही. दोन्ही काठावरील गावकरी एकत्र येऊन आपण लोकसहभागातून व श्रमदान केल्यास या पैनगंगा नदीवर पुलाचे निर्माण होऊ शकते, अशी संकल्पना मांडली. त्याला गावकऱ्यांनी देखील पाठिंबा देत अवघ्या 14 दिवसांत 15 लाख 80 हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली.
हेही वाचा - नाशिक : मालेगावात विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी हवेत गोळीबार
विद्यार्थी, रुग्णांची मोठी सोय -
'सर्वांचा हेतू पैनगंगा नदीवरील सेतू', हेच ब्रीद वाक्य घेऊन सतत 15 दिवस श्रमदान करून या नदीवर सुंदर पुलाची निर्मिती झाली आहे.
प्रशासनाची कसलीही मदत न घेता पळशी आणि मनूला या दोन गावातील नागरिकांच्या एकोप्याने हा पूल तयार झाला आहे. यामुळे विद्यार्थी आणि रुग्णांसाठी मोठी सोय झाली आहे. नागरिकांनी एकत्र येत लोकसहभागातून केलेल्या या कामाची नांदेडकरांकडून प्रशंसा होत आहे.