नांदेड - प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचा अतिवापर होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. याला पर्याय म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विषयाच्या पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी धान्यापासून खाण्यायोग्य प्लास्टिक निर्मितीचा म्हणजेच बॉयोप्लास्टिकचा शोध लावला आहे. विद्यापीठाने जे संशोधन केले आहे, त्याचे पेटंट केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती कुलगुरू यांनी ईटिव्ही भारतला दिली
धान्याच्या पिठाचा कच्चामाल वापरुन बनवली पातळ फिल्म रसायनशास्त्र संकुलातील एमएस्सी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, गहू, सोयाबीन आणि तूरडाळ यासारख्या संपूर्ण धान्याच्या पिठाचा कच्चामाल म्हणून वापर करून पातळ फिल्मची निर्मिती केली आहे. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील संशोधन प्रकल्पाचा हा एक भाग आहे. या पातळ फिल्म्सचा वापर अन्नपदार्थाच्या पॅकिंगसाठी केला जातो. हरित अन्नपदार्थ पॅकिंग मटेरियल म्हणून त्याचा संभाव्य वापर अभ्यासला गेला आहे. रसायनशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. ओमप्रकाश येमुल यांच्या मार्गदर्शनाखाली बहुलक रसायनशास्त्राच्या (पॉलिमर केमिस्ट्री) चे विद्यार्थी सोनिया खानसोळे, स्नेहा देशमुख, सुजाता जाधव, रितिका मणी, वैष्णवी ठोकळ, साक्षी काळे आणि बेग फिजा मिर्झा अमान यांनी या पॉलिफिल्म्सची निर्मिती केली आहे.
खाण्यायोग्य प्लास्टिक आरोग्यास हानिकारक नाही प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, त्याचप्रकारे उपयुक्त अशा प्लास्टिकचे काही तोटे सुद्धा आहेत. जीवाश्म इंधनापासून मिळणाऱ्या प्लास्टिकचा जैवविघटन कालावधी जास्त असतो. याशिवाय उत्पादनात हानिकारक रसायनाचा वापर हरितगृह वायू उत्सर्जन हे हवामान बदलासाठी जबाबदार मुख्य प्रदूषकांपैकी एक आहे. खाद्य किंवा खाण्यायोग्य प्लास्टिक हे आरोग्यास हानिकारक नसलेले आणि लहान प्राणी किंवा मनुष्याला सहज सेवन करता येऊ शकणारे पदार्थ असतात. ते पॉलिसॅक्राइडस, प्रथिने, लिपीडस, चरबी, कृषी कचरा इत्यादीपासून तयार केले जातात.
अन्न, औषधे, सौंदर्य-प्रसाधने, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत उपयोग पेट्रोलियम आधारित कृत्रिम प्लास्टिकपेक्षा खाद्य किंवा खाण्यायोग्य प्लास्टिकचे फायदे जास्त आहेत. जसे की ते पर्यावरणास अनुकूल आणि पुनर्वापर करण्यायोग्य असते. याशिवाय त्याचा वापर करून प्रदूषण कमी करणे, ऑर्गनोलेप्टीक गुणधर्म वाढवणे, कंपोस्टेबल, प्राणी, मनुष्यांना वापरणे शक्य आहे. या गुणामुळेच खाद्य किंवा खाण्यायोग्य प्लास्टिक हे जीवाश्म इंधनापासून निर्मित प्लास्टिकला उत्तम पर्याय आहे. त्याचा वापर अन्न, औषधे, सौंदर्य-प्रसाधने, जलशुद्धीकरण आणि ऊर्जा निर्मिती प्रक्रिया इत्यादीमध्ये करता येतो.
रोजगार निर्मितीला चालना शेती हा महाराष्ट्र राज्याचा कणा आहे. जवळपास ८२ टक्के ग्रामीण लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, हळद, कांदा, कापूस, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग इत्यादी प्रमुख पिके आहेत. संपूर्ण धान्यापासून खाद्य किंवा खाण्यायोग्य प्लास्टिकची निर्मिती हा एक उत्तम पर्याय असेल. अन्न पॅकिंगसाठी संपूर्ण धाण्यापासून प्लास्टिकच्या पातळ फिल्म्सची निर्मिती करणे ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी व्यवसायाची एक संधी आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रा. डॉ. ओमप्रकाश येमुल यांनी सांगितले.
प्रदूषण समस्येला बॉयोप्लास्टिक पर्याय या बॉयोप्लास्टिक निर्मितीला निश्चितच एक चांगले भविष्य आहे. जगासमोर बॉयोप्लास्टिक ही संकल्पना किंवा शोध आपण मांडतो ही निश्चितच आपल्या विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. डॉ. ओमप्रकाश येमूल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. जगातील प्लास्टिक प्रदूषण समस्येला बॉयोप्लास्टिक हा पर्याय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ देत आहे. या पेटंटचा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवणार असल्याचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले.