नांदेड : लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या २०२० च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात नांदेडचा सुमितकुमार दत्ताहरी धोत्रे हा देशात 660 वी रँक मिळवून उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे सुमितकुमारने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्याचे कौतूक केले जात आहे.
बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मेरिट अवॉर्ड देवून सन्मानित
सुमितचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण नांदेडच्या टायनी एंजल्स स्कूलमध्ये झाले. दहावीत तो 100 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम आला होता. याबद्दल त्याला भारत सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मेरिट अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले होते.
दहावीपर्यंत दिल्या 127 परीक्षा
दहावीपर्यंत त्याने वेगवेगळ्या १२७ स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. यात त्याला ११ सुवर्णपदक मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आयआयटीचे प्रशिक्षण देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतही तो राज्यातून पहिला आला होता. त्याचे अकरावी-बारावीचे शिक्षण मुंबई येथे झाले. तर आयआयटी खरगपूरमधून त्याने इलेक्ट्रॉनिक्समधून बीटेक पदवी २०१८ मध्ये प्राप्त केली.
खाजगी कंपनीत मोठे पॅकेज असतानाही दिला राजीनामा
इलेक्ट्रॉनिक्समधून बीटेकची पदवी घेतल्यानंतर सुमितकुमारची कॅम्पसमध्ये रिलायन्स इंडस्ट्री नागोठाणासाठी निवड झाली होती. मात्र, येथे मोठे पॅकेज असतानाही त्याने नोकरीचा राजीनामा देवून यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू केला. याचवेळी महाराष्ट्र शासनाच्या बार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने यश संपादन केले होते.
वडिल पत्रकार तर आई शिक्षिका
सुमित हा सत्यप्रभाचे पत्रकार दत्ताहरी धोत्रे यांचा सुपूत्र आहे. त्याची आई सूर्यकांता धोत्रे या मुकुंद आंबेडकर प्राथमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
अशोक चव्हाण यांच्याकडून अभिनंदन
नांदेडच्या सुमितकुमार धोत्रे याने यूपीएससी परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच, भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
हेही वाचा - युपीएससीत बिहारच्या शुभम कुमारने पटकावला पहिला क्रमांक
हेही वाचा - युपीएससीचे निकाल जाहीर; उस्मानाबादचा निलेश गायकवाड सलग दुसऱ्या वर्षी रँकमध्ये
हेही वाचा - नीटच्या परीक्षेतील घोळ हा व्यापम पेक्षाही मोठा घोटाळा आहे - नाना पटोले