नांदेड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने १४ एप्रिलपर्यंत जमावबंदी तसेच लॉकडाऊन घोषीत केलेला असताना, घराबाहेर पडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ६० जणांविरद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
हेही वाचा- मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
कोरोना महामारीने जगभरात हाहाकार उडविला आहे. त्यामुळे अनेकजणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार चालू असताना, अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे. १४ एप्रिलपर्यंत जमावबंदी तसेच लॉकडाऊन घोषीत केली आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे नांदेड शहर व ग्रामीण भागात रस्त्यावरुन विनाकारण फिरणाऱ्या ६० जणांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
गुन्हा नोंद झालेला ठाणेनिहाय तपशील-
वजिराबाद-८, भाग्यनगर- ४, विमानतळ- ५, शिवाजीनगर-३, नांदेड ग्रामीण- ६, इतवारा- ३, बारड-३, धर्माबाद-२, अर्धापूर-२, उस्माननगर-१, माहूर-२, कुंडलवाडी-१, तामसा-१, हदगाव-८, मुखेड-२, सोलापूर-२, मुक्रमाबाद-१, भोकर-३, किनवट-२.
या पुढेही लॉकडाऊनच्या कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यांची वाहने जप्त केली जातील असा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.