नांदेड : दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नांदेडमध्ये लग्न आटोपूण घरी परतणाऱ्या दोन जिवलग मित्रांवर काळाने घाला घातला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदेड- बारड रोड वरील खैरगाव पाटीजवळ हा भीषण अपघात घडला. संदीप काळे आणि राहुल कोलते, असे या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी येथे बांधकाम करणाऱ्या दोन मिस्त्रीं मजुरांचा मृत्यु झाला. विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना 11 मे रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान घडली.
ट्रकची दुचाकीला धडक : संदिप काळे (वय ३३), राहुल कोलते (वय २८ ) हे दोघे नांदेड शहरातील चौफाळा भागातील पंचशील नगर येथील रहिवासी आहेत. गुरुवारी दुपारी दोघ जण बुलेटवरून भोकर ला लग्नाला गेले. लग्न लावून परत ते दोघे भोकरहुन नांदेडकडे परत निघाले. नांदेड- बारड रोडवरील खैरगाव पाटीजवळ आले असता. भोकर फाट्याकडून बारडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, बुलेट फरफटत गेली. दोन्ही तरुण ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले
ट्रक चालकाविरोधात गुन्हा : घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक आणि बारडचे पोलीस उपनिरीक्षक हानुमंत कवले घटनास्थळी दाखल झाले. ठप्प झालेली वाहुतक सूरळीत करण्यात आली. दरम्यान बारड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर दोघांचे पार्थिव उशीरा राहत्या घरी आणण्यात आले. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बांधकाम सुरू असताना विजेचा शॉक : विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेत गावातील युवक केशव भागवत गाडे हा तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, चिलपिंपरी येथे हरी गाडे यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी गावातील बांधकाम मिस्त्री पुंडाजी बाबाराव गाडे (वय 25) वर्ष व संभाजी आनंदा गाडे हे (वय 24) वर्ष हे दोघे बांधकाम करीत होते. त्यादरम्यान बांधकामासाठीचे पिलर उभे करत असताना त्याचा झोक गेल्यामुळे सदरचे पिल्लर लगत असलेल्या विद्युत तारांवर धडकले. त्यामुळे क्षणार्धात आग डोंब उसळला. व त्यांना शॉक बसला.
दुर्घटनेबाबत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया : गावामध्ये सदर घटना वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संबंधितांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालयाकडून पोलिसांना कळविण्यात आली. या दुर्घटनेबाबत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून चिलपिंपरी येथे दोन्ही मृतांच्या पार्थिवावर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा : Bus Accident in Wardha: वर्ध्यात बसचा विचित्र अपघात; तीन बस एकमेकांना धडकून 15 जण जखमी
हेही वाचा : Nitin Gadkari News: ...म्हणून २००४ मध्ये अपघातात संपुर्ण कुटुंब वाचले- नितीन गडकरी