नांदेड - भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. लातूर राष्ट्रीय महामार्गावरील पारडी या गावालगत विक्की मंगल कार्यालयजवळ ही घटना घडली. मारोती उर्फ अळू व्यंकटराव मोरे (वय 33) आणि बळी उमाजी पवार (वय 36) अशी मृतांची नावे आहेत.
दोघेही रात्री साडेआठच्या दरम्यान कामानिमित्त लोह्याकडे जात होते. त्याच दरम्यान लोह्याकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. दुचाकीवरील बळी उमाजी पवार ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकने दुचाकीला जवळपास दीडशे फूट फरफटत नेले. यामुळे दुचाकीवरील मारोती मोरे गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी ट्रक जॅकद्वारे उचलून त्याखालून जखमी मोरे यांना बाहेर काढले. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलवण्यात आले. मात्र, गंभीर जखमी मारोती मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, घटना घडताच ट्रक चालक पसार झाला. पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी घटनास्थळाची पाहणी आणि पंचनामा केला. सदर घटनेप्रकरणी लोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.