नांदेड - शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी एका दुकानातून सोन्याच्या दोन बांगड्या हातोहात लंपास केल्या. ही घटना टाक अॅन्ड सन्स धानोरकर या दुकानात मंगळवारी दुपारी घडली.
सराफा बाजारात सुधाकर टाक यांच्या मालकीचे टाक अॅन्ड सन्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी दुपारी दोन बुरखाधारी महिला सोने खरेदीसाठी आल्या होत्या. सोन्याच्या बांगड्या दाखवत असताना दुकानमालक व कामगारांचे लक्ष विचलीत करून त्यांनी हातचलाखीने 'एसजीटी ९१६० हॉलमार्क लोहो' अशा वर्णनाच्या ५६ हजार रुपये किंमतीच्या साडेसतरा ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या लंपास केल्या.
ही बाब सायंकाळी दुकान बंद करीत असताना दागिने मोजताना लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी दोन बुरखाधारी महिलांनी त्या बांगड्या चोरल्याचे समजले. दुकानमालक सुधाकर टाक यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार आडे करत आहेत.