नांदेड - नातीसाठी टरबूज आणायला गेलेल्या एका वृद्धाला टिप्परने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील लातूर फाटा परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली, माधवराव गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते वसरणी येथील रहिवासी आहेत.
मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरानजीक वसरणी येथे राहणारे माधवराव गायकवाड हे आपल्या नातीसाठी लातूर फाटा येथे टरबूज विकत घ्यायला गेले होते. दरम्यान, माती वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात गंभीर दुखापत होऊन गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर गायकवाड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.