नांदेड - माहूर तालुक्यातील हिंगणी गावातील शेतात कापून ठेवलेल्या पंचवीस क्विंटल तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची घटना घडली. यात हबीब नवाब या शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. तुरीच्या गंजी जाळण्याचे प्रकार वाढल्याने हिंगणी येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी या बाबत तहसील, पोलीस ठाण्यात आज (सोमवारी) सामूहिक अर्ज देऊन नुकसान भरपाई देत तत्काळ आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - नाशकात पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
हिंगणी येथे हबीब नवाब यांची (सर्वे क्र 174) शेती आहे. ते दररोज फुलसावंगी येथून हिंगनी येथे येऊन शेती करतात. शेतात उभी तूर वाळल्याने त्यांनी कापून गंजी लावून शेतात ठेवली होती. काल (रविवारी) सायंकाळी हिंगणी येथून त्यांना गावकऱ्यांनी तुमच्या तुरीच्या गंजीला आग लागल्याचा दूरध्वनी केला त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली शेतात पाण्याची व्यवस्था नसल्याने गावकरी ही हतबल झाले.
आगीमध्ये सर्व तुरीच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. उपस्थित गावकऱ्यांनी ही आग कुणीतरी जळाऊ वृत्तीने लावल्याचा निष्कर्ष काढून या आधीही अश्या घटना घडल्या असून, त्या आरोपींचा शोध न लागल्याने पुन्हा अश्या घटना घडू नये यासाठी सरपंच, उपसरपंच सह सर्व गावकऱ्यांनी नवाब यांना नुकसान भरपाई देत तात्काळ आरोपींना पकडण्याची मागणी तक्रारवजा निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक माहूर यांच्याकडे केली आहे. दिलेल्या तक्रारीत 60 ते 70 स्थानिक शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश