नांदेड - टीव्हीचा आवाज मोठा करून काही युवक आरडाओरड करत असल्याचे पाहून हॉटेल चालकाने टीव्ही बंद केला. दरम्यान, टीव्ही बंद का केला म्हणून हॉटेल चालकास मारहाण केल्याची घटना अमृत हॉटेल (गांधीनगर) येथे घडली. या प्रकरणी तीन जणांविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या बाळू खोबरे व त्याचे दोन साथीदारांनी टीव्हीचा आवाज मोठा केला. आवाज मोठा करून जोरजोराने आरडाओरड करत होते. या प्रकाराचा त्रास अन्य ग्राहकांना होत होता. ग्राहकांना त्रास होत असल्याचे पाहून अमृत हॉटेल चालक सुदेश गोविंद नारायण गुप्ते (रा. विसावानगर) यांनी समजूत काढत टीव्ही बंद केला. यानंतर टीव्ही बंद का केला म्हणून बाळू खोबरे व त्याच्या दोन साथीदारांनी हातातील कड्याने हॅाटेलचालकाला मारहाण केली.
यामध्ये सुरेश गुप्ता यांच्या डाव्या डोळ्याला जबर मार लागला आहे .या प्रकरणी गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बाळू खोबरे व त्याच्या दोन साथीदारांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.