नांदेड - जिल्ह्यातील आणखी तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील दोन रुग्ण हे पंजाब येथून परतलेले आहेत. त्यांना शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. तर, एक रुग्ण खासगी रूग्णालयात दाखल आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.
सध्या नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २९ झाली असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी लंगर साहिब गुरुद्वारा येथील २० कर्मचारी शनिवारी कोरोनाबाधित आढळले होते. तर, पंजाबमधून परतलेल्या तीन ट्रॅव्हल्स चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय लॉकडाऊनचे उल्लंघन करून पंजाबच्या यात्रेकरूंना सोडून नांदेडमध्ये परतलेला एक वाहनचालकही पॉझिटिव्ह आढळला होता. आता यात आणखी तीन रुग्णांची वाढ झाली असून सध्या जिल्ह्यात २७ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
अधिक वाढली नांदेडकरांची जबाबदारी....!
नांदेड शहरात रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आता अधिक खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी घरीच राहावे. सुरक्षित राहावे. बाहेर जाणे आवश्यक आहे का, याचा दहा वेळा विचार करूनच घराबाहेर पडावे आणि कोणाच्याही थेट संपर्कात न येता शारीरिक अंतर पाळावे. चेहऱ्यावर मास्क लावावा किंवा रुमालाने चेहरा झाकून ठेवावा. आपले हात वारंवार साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे तसेच बाहेर पडल्यास सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.