नांदेड - सिडको परिसरातील दत्तनगर भागात भरवस्तीतील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील नगदी रक्कम व सोन्याचे दागिने मिळून जवळपास २ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले असता श्वानाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. केशव पुंडलिक कोलते हे नेहमीप्रमाणे यशोसाई रुग्णालयात रात्रपाळी कामासाठी गेले होते. तर, त्यांची पत्नी मुलासह दुपारीच माहेरी गेली असल्याने त्यांचे घर बंद होते. दरम्यान, सुरेश लांडगे यांनी कोलते यांना भ्रमणध्वनीवरून घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच कोलते यांनी तत्काळ निवासस्थान गाठले. यावेळी त्यांना त्यांना दोन्ही कपाटाची दारे उघडी असलेली दिसली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी करून पंचनामा केला.
हेही वाचा - नववर्षाच्या स्वागतावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूकडे लक्ष द्यावे, नागरिकांची मागणी
या चोरीत कपाटातील नगदी ४२ हजार रुपये, ३ तोळ्यांचे सोन्याचे गंठण, २ अंगठ्या असा जवळपास २ लाख २० हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. पंचनाम्यानंतर श्वान पथकासह ठसेतज्ञ पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घोळवे करीत आहेत.
हेही वाचा - अशोक चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी, 'हे' खाते मिळण्याची शक्यता