नांदेड- शहरातील सन्मित्र कॉलनीतील एका सेवानिवृत्त अभियंत्याची घरी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अज्ञात चोरट्यांनी शिताफीने घरात शिरून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ९ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सन्मित्र कॉलनीत सेवानिवृत्त अभियंता लक्ष्मण व्यंकटेश शेटी ( भरडे ) यांचे निवासस्थान आहे. मंगळवारी रात्री जेवण करून ते आपल्या बैठकीत झोपले असता बुधवारी पहाटे दोन ते चारच्या सुमारास अज्ञात चोरटे त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने वर चढले. चोरट्यांनी छतावरून घरात प्रवेश केला. त्यावेळी शेटी व त्यांचा परिवार ज्या खोलीत झोपला होता त्या खोलीच्या बाजूला असलेल्या बेडरुममध्ये चोरटे घुसले. कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख ९ लाखाचा ऐवज लंपास केला. ही बाब लक्ष्मण शेटी यांना सकाळी निदर्शनास आली. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चोरटे कैद झाले होते. चोरटे दोरीच्या सहाय्याने वर चढून त्याच मार्गे खाली उतरले होते. या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.