नांदेड - आजच्या युगात टिव्ही, मोबाईलसह विविध साधने उपलब्ध असतानाही मागील १०० वर्षांपासून (१९१८ ) नांदेडमधील शेलगांव येथे दरवर्षी यात्रेनिमित्त गावातील कलाकार ३ अंकी नाटकाचे सादरीकरण करतात. या माध्यमातून ही कलाकार मंडळी नाट्यकलेचा वारसा जोपासत आहेत. यासाठी ३ महिने आधीपासूनच नाटकाची कथा निवडून तालमीला सुरुवात केली जाते.
या नाटकात सर्व कलाकार गावातीलच असतात. प्रत्येक जण आपले दैनंदिन कामकाज सांभाळत दररोज रात्री आत्माराम महाराज संस्थानच्या मठामध्ये तयारी करतात. उल्लेखनीय बाब म्हणजे हिंदूंसोबतच मुस्लीम तरूणही या नाटकात भूमिका साकारत आलेले आहेत. गेल्या ५० वर्षापासून बालाजी नामदेवराव राजेगोरे या नाटकांचे दिग्दर्शन करत आहेत. ना कुठला मोबदला, ना कसला आर्थिक लाभ, तरीही ही नाटकाची परंपरा गावचा प्रत्येक युवक जोपासत आहे.
हे नाटक पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट आकारले जात नाही. तरीही या कलेवर खुश होऊन दर्दी रसिक प्रेक्षक कलाकारांना प्रोत्साहन म्हणून पैसे दिले जातात. दरवर्षी या बक्षीसाची रक्कम लाखाच्या आसपास असते. गावातील तसेच गावाबाहेरचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावतो. तत्कालीन शाळेचे शिक्षक बाबुलाल जयस्वाल यांनी गावकऱ्यांना नाटकांची ओळख करून दिली. बाबुलाल गुरूजींनी अथक मेहनतीतून गावातील कलाकारांना तयार केलं. यातील बहुतेक कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत, परंतु नाटकाची परंपरा भावी पिढीकडे त्यांनी सुपूर्द केली आहे.
शेलगावात नोकरीनिमित्त आलेले बाबुलाल गुरुजी गावाला एक समृद्ध परंपरा देऊन गेले. त्यांच्याबद्दल विशेष अशी माहिती उपलब्ध नाही. परंतु, जुन्या कलाकारांच्या मते स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९४४ मध्ये पहिला नाट्यप्रयोग शेलगावात करण्यात आला. आत्तापर्यंतच्या गावातील नाटकाच्या इतिहासात स्त्री पात्रे ही पुरुषांनीच वठवली आहेत. पूर्वी नाटकांच्या कथानकानुसार नाट्यपद असायचे. आता यामध्ये लोकप्रिय मराठी चित्रपट गीतांच्या माध्यमातून कथानक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे निरस झालेल्या कथानकात चैतन्य निर्माण केले जाते. याच गीतांना 'वन्स मोअर'साठी बक्षिसे दिली जातात. त्यामुळे देणगीत खूप सारी वाढ झाली आहे. आजच्या युगात मनोरंजनासाठी विविध डिजिटल साधन उपलब्ध असतानाही ही परंपरा गावकरी जोपासून कलेचा वारसा पुढे चालवत आहेत.