नांदेड - शालेय जीवनात अनेक विद्यार्थी ‘विज्ञान प्रदर्शना’द्वारे आपल्या संशोधनाचे कौशल दाखवत असतात. त्यामध्ये त्यांना पारितोषिकेही मिळतात, पण पुढे महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांना त्या संशोधन वृत्तीचा विसर पडतो. त्यामुळे बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची बीजे रोवली पाहिजे, असे मत अमेरिकेतील जगप्रसिद्ध प्राध्यापक उमेश बनकर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘ड्रग डिस्कवरी अॅण्ड डेव्हलपमेंट: लॅब टू क्लिनिक’ विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ विद्याशाख्येचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, डॉ.भाऊसाहेब पाटील, रसायनशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. भास्कर दवणे आणि औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. शशिकांत ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - ९७ वर्षांच्या आजी लढवणार सरपंचपदासाठी निवडणूक..!
पुढे बोलताना प्रो. बनकर म्हणाले, कल्पनेचे रुपांतर आधुनीक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादनामध्ये करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संशोधकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. औषधनिर्माणशास्त्रामध्ये अनेक संस्था संध्या उपलब्ध आहेत. रोज नवनवीन औषधी बाजारपेठेत येत असतात. आणि आपला वाटा काबीज करण्याचा प्रयत्न करीत असतात. तरी संशोधक विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्रांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे स्वतःचे स्वामीत्व विकसीत करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना केले.
हेही वाचा - 'पटानी'च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर
अध्यक्षीय समारोपामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठचा विकासात्मक आढावा थोडक्यात मांडला. औषध निर्माण शास्त्रामध्ये जगभरात दिवसेंदिवस अनेक नाविन्यपूर्ण अशा औषधी तयार होत आहेत. त्यादृष्टीने विद्यापीठ इतर देशातील विद्यापीठांशी सामंजस्य करार करून विचारांची, संशोधनाची आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करीत आहे. जेणेकरून विद्यापीठ संशोधनामध्ये येणाऱ्या काळात जगभरामध्ये स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करेल. या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी नवीन आयामांची माहिती घ्यावी, नवीन नियमावली व संशोधनाच्या अत्याधुनीक उपकरणांची, तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. आणि नवनवीन समाजोपयोगी संशोधन करून विद्यापीठाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
हेही वाचा - 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला
प्रस्ताविकामध्ये औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. शशिकांत ढवळे म्हणाले, औषधनिर्मितीमध्ये भारतीय कंपन्यांनी गेल्या दोन दशकांमध्ये प्रचंड प्रगती केली आहे. ग्लोबलायझेशनमध्ये ३६० पैकी २३८ ड्रग फाईल ह्या भारतीय आहेत. म्हणजेच जगभराच्या तुलनेत एकूण ६७ टक्के भारतीय औषधी क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा आहे. त्यामुळे औषधांचा नवीन उपयोग दिवसेंदिवस वाढत आहे.
विद्यापीठ परिसरातील औषधनिर्माणशास्त्र संकुल आणि रसायनशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ व १८ जानेवारी या दरम्यान विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये दोनशेपेक्षा अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय क्षीरसागर यांनी तर आभार डॉ. एस. एस. पेक्कमवार यांनी व्यक्त केले.