नांदेड - शहरातील नगीनाघाट परिसरातील लंगरसाहिब गुरुद्वाराच्या पाठीमागील मुख्य रस्त्यावर असलेल्या अन्य एका छोट्या गुरुद्वाराच्या मुख्य पुजाऱ्याची हत्या झाली आहे. बाबाजी संतोकसिंघ नेहग असे त्या पुजाऱ्याचे नाव आहे. अज्ञात आरोपीनी तीक्ष्ण हत्याराने वार करून बाबाजी संतोकसिंग यांची हत्या केल्याची ही घटना गुरुवारी घडली. पुजाऱ्याचा खून झाल्याचे समजताच शहरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून तपासाची चक्रे फिरवली असली तरी, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध लागू शकला नाही. आरोपीच्या शोधासाठी एलसीबीचे वेगवेगळे पथक तसेच वजिराबाद ठाण्याचे पथक असे पोलिसांचे चार पथक शोध मोहीम राबवित असल्याचे सांगण्यात आले.
जुन्या गुरुद्वारात करत होते सेवा-
बाबाजी संतोकसिंघ यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे समोर आले नाही. नगीनाघाट भागातील लंगरसाहिब गुरुद्वाराच्या पाठीमागे आणखी एक छोटा गुरुद्वारा आहे. सुमारे ६०-७० वर्षे जुना असलेल्या या गुरुद्वारात संतोकसिंघ मोहनसिंघ नेहंग हे गेली अनेक वर्षांपासून सेवा करत होते.
तीक्ष्ण हत्याराने केली हत्या-
गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे एक ते चारच्या दरम्यान घडली असावी , असा पोलिसांचा अंदाज आहे. लंगरसाहिब गुरुद्वाराचे सेवक गुरुमितसिंघ महाजन यांना संतोकसिंघ हे रक्ताच्या थोराळ्यात पडल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती वजिराबाद पोलिसांना कळविली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, वजिराबाद ठाण्याचे प्रभारी पोउपनि शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
घटनास्थळी केला पंचनामा-
घटनास्थळी पंचनामा करून संतोकसिंघ नेहंग यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुरमितसिंघ महाजन यांच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी खून केल्यानंतर संतोकसिंघ नेहंग यांची दुचाकी व काही रक्कम पळविल्याची चर्चा पोलीस दलात होत आहे. आरोपी नेमके किती आहेत, याची माहिती समोर येऊ शकली नसली तरी, दोन आरोपी असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींच्या शोध मोहिमेसाठी पोलिसांचे वेगवेगळी चार पथके तैनात केली आहेत , औंढा, नरसी तसेच नांदेड शहरातील धार्मिक स्थळातून शोध मोहीम राबविली जात असल्याचे सांगितले जाते.