नांदेड - बाभळीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना तीन वेळा निरोप दिला. मात्र, ते रात्रीच्या वेळेला कुठे जातात माहीत नाही. त्यांच्याशी संपर्कच होत नाही, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर केली आहे. धर्माबाद येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रम आयोजित सभेत ते बोलत होते.
बाभळीसाठी उद्धव ठाकरे यांना साकडं -
बाभळी पाणी प्रश्न हा नांदेडकरांसाठी महत्वाचा विषय आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वादात गोदावरी नदीचे पाणी समुद्रात वाहून जात आहे. त्यासाठी दोन्ही राज्यांनी एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना तीन वेळा फोन केला आणि तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून उत्तर येत नाही. परंतु बाभळीचा प्रश्न सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, गरज पडल्यास हैद्राबाला जाऊन त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण दिली.
१३ वर्षाचा लढ्याला अपयश -
महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमध्ये १३ वर्षांपासून पाणी वाटपावरून वाद सुरू होता. २०११ मध्ये आंध्रप्रदेशचे तत्कालीन विरोधीपक्ष नेते चंद्रबाबू नायडू बाभळी बंडाऱ्यावर उपोषणाला बसले होते. आठ ते नऊ दिवस हे आंदोलन सुरू होते. दरम्यान नायडू यांनी बॉम्बस्फोट करून बाभळीचे गेट उडवून देऊ, अशी धमकी देखील दिली होती. ४ मार्च २०१३ रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि पाणी अडवण्यास निर्बंध घातले. त्यानुसार २९ ऑक्टोबर रोजी बाभळीचे गेट बंद केले जातात तर १ जुलै रोजी गेट उघडले जातात.
मग तेलंगणात कशाला जाता -
लोकसभा निवडणुक २०२० पूर्वी धर्माबाद तालुक्यातील २० गावांनी तेलंगणात जाण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिला होता. त्यावेळी या विषयावरून राजकारणदेखील झाले होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री प्रतिसादच देत नसतील तर मग कशाला तेलंगणात जाता असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - 'महागाईमुळे जनता त्रस्त तर मोदी सरकार कर वसुलीत व्यस्त'