नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अॅन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले. चव्हाण यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा... "राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्ती देण्यात कोणत्या अडचणी आहेत?"
प्रयोगशाळेची पाहणी करताना अशोक चव्हाण यांच्यासमवेत आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. गजानन झोरे, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केवळ तीन आठवड्यात मान्यता
कोणत्याही प्रयोगशाळेसाठी एनएबीएलची मान्यता असणे ही आवश्यक बाब आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्याचा असतो. परंतु विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेतील समितीतर्फे फक्त तीन आठवड्यात ही मान्यता मिळवली आहे. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. गजानन झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रा. संजय मोरे, डॉ. सुप्रिया यमेकर, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. मनमोहन बजाज, संदीप काळे यांची प्रमुख भूमिका होती. दि. २५ आणि २६ एप्रिल रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीमार्फत करण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसात या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत.
दररोज शंभरपेक्षा अधिक स्वॅबची तपासणी
नांदेड येथील कोरोना स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते. त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत असे. अशोक चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, डॉ. गजानन झोरे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अगदी तीन आठवड्यात या प्रयोगशाळेची उभारणी झाली. सध्या दररोज सरासरी १०० हून अधिक हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून कोरोना स्वॅबचे नमुने येत आहेत. नमुने कमी असल्यामुळे सध्या मॅन्युअल पद्धतीने काम चालू आहे. एक शिफ्ट ही सहा ते सात तासांची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त २५० नमुन्याची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सातपर्यंत देता येतो. दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
प्रयोगशाळेत स्वेच्छेने विद्यार्थी देतायेत सेवा
या प्रयोगशाळेमध्ये विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील पीएच.डी. आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छेने काम करत आहेत. यामध्ये व्यंकटेश जाधव, डॉ. सुजाता इंगळे, मनोज रामपुरी, पियुष वालुकर, नेहा भुरे, काजल भोसले, आनंद पवार, दिशा बसवे यांचा समावेश आहे.