नांदेड - घरी बागायती जमीन पण मनात मात्र जिद्द अधिकारी होण्याची.. एकामागून एक तीनही भावंडानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी बनले आहेत. पांगरी (ता.अर्धापूर ) छोट्याशा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या तरुणात जणू शैक्षणिक प्रगतीची स्पर्धा लागली आहे. या कुटुंबातील तरुण जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक व मंत्रालयात कक्ष अधिकारी झाले आहेत. गोरे कुटुंबातील तिन्ही भावंडानी यश मिळवून एक चांगला आदर्श ठेवला आहे.
शेतकरी कुटुंबात अधिकारी होण्याची चढाओढ -
आपल्या कुटुंबात एक तरी शासकीय अधिकारी व्हावा या जिद्दीने येथील शेतकरी कुटूंबात चढाओढ लागली आहे. पांगरी या छोट्याशा गावात शासकीय अधिकारी, कर्मचारी झाले आहेत. येथील गोरे कुटूंबात तीन शासकीय अधिकारी झाल्याने शेतकरी पित्याच्या कष्टाचे चीज झाले आहे.
शेतकरी पुत्रांची स्पर्धा परीक्षेतील यशोगाथा.. कृषी दिनाच्या दिवशी आला निकाल -गोरे कुटुंबातील तरुण जिद्दीने पोलीस उपनिरिक्षक, सेवा निरीक्षक व मंत्रालयात कक्षा अधिकारी झाले आहेत. विशेष म्हणजे एक जुलै या कृषी दिनी पोलीस उपनिरिक्षक निवडीची यादी लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाला दिली आहे. कृषीदिनी शेतकरी कुटूंबाला मिळालेली ही मोठी भेट आहे. शेतकरी कुटूंबाच्या आनंदात दूधात साखर पडल्यासारखी स्थिती आहे.
तिन्ही भावंडाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत -
तिन्ही भावंडांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. गावात शासकीय अधिकारी होण्याची स्पर्धा तरुणांमध्ये लागली आहे. पांगरी हे शे-सव्वाशे उंबरठे असलेले छोटे खेडेगाव आहे. शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेती चांगली कसदार व पाण्याची सुविधा आसल्यामुळे शेतीतील उत्पन्न वाढीसाठी नव नवीन त॔त्रज्ञाचचा उपयोग केला जातो. शेतीची कास व शिक्षणाची आस धरलेला पांगरीकरांनी इतर खेडे गावातील तरूणांसमोर आदर्श ठेवला आहे. या गावात असेच एक शेतकरी कुटूंब आहे. या कुटुंबात भरपूर बागायती क्षेत्र आहे. कुटुंबाचे उत्पन्नही बऱ्यापैकी आहे. पण नरहरी गोरे यांनी मात्र मुलांना शेती सोबत शिक्षणालाही तेवढेच महत्त्व दिल्याने गोरे कुटूंबात तीन शासकीय अधिकारी झाले आहेत. पांगरी येथील जनार्धन व नरहरी गोरे या बंधुंचे एकत्रित शेतकरी कुटूंब आहे. या कुटूंबाचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या कुटुंबातील संभाजी जनार्धन गोरे हे सेवा कर निरीक्षक झाला आहे. तर त्याचा छोटा भाऊ आनंदा जनार्धन गोरे हे गृह मंत्रालयात कक्ष अधिकारी झाले आहेत. पहिले दोन बंधू शासकीय अधिकारी झाल्याने तिसरा दत्ता नरहरी गोरे यांनीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. या तीन बंधूंपैकी दोन अभियंते तर एक एमएसी अग्री असे उच्चशिक्षित आहेत.
2016 मध्ये दिली होती परीक्षा -
पोलीस प्रशासनात जाण्याचे स्वप्न दत्ता गोरे यांनी पाहिले. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी पुणे गाठले. या शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्न्यात अपयश आले. या अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करून 2016 मध्ये पुन्हा परिक्षा दिली. यात त्यांना यश आले पण समांतर आरक्षणामुळे पुढची प्रक्रिया थांबली होती.
कृषी दिवस गोड झाला -
उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी मॅटमध्ये दाद मागितली. या मॅटने उमेदवारांच्या बाजुने निर्णय दिला. या मॅटच्या निर्णयाविरूद्ध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने ही मॅटचा निर्णय कायम ठेवत उमेदवारांच्या बाजूने दिल्यानंतर आयोगाने पात्र उमेदवारांची यादी शासनाला कृषीदिनी (दि.१ जुलै) सादर केली. यात दत्ता गोरे यांच्या नावाचा समावेश आहे. ही गोड बातमी गोरे कुटूंबाला कळताच त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. यंदाचा कृषी दिवस गोड झाला.
दोन्ही बंधूंची प्रेरणा घेऊन कामाला लागलो -
आमचे दोन बंधू शासकीय अधिकारी झाल्याने मला ही अधिकारी होण्याची आवड निर्माण झाली. यातून जिद्दीने अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षेत उत्तीर्ण झालो. पण समांतर आरक्षणाचा तिढ्याने पाच वर्षे वाट पाहावी लागली. पहिली दोन वर्षे निकालाची वाट पाहण्यात गेले./तर तीन वर्षे न्यायालयीन लढाईत गेले. शेवटी न्याय मिळाला. कोरोनाच्या काळात शेतीच्या कामात गुंतलो होतो. कृषी दिनी ही बातमी मिळाली. आमच्या कुटूंबाला खूप मोठा आनंद झाला, आशा भावना दत्ता गोरे यांनी व्यक्त केल्या.
शेती आणि नोकरीला समान महत्व -
उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी आसे सुत्रसंचलन आमच्या काळात सांगण्यात येत होते. पण आम्ही शेती आणि नोकरी यांना समान महत्व देवून मुलांना उच्च शिक्षण दिले.आमच्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी मुलांनी कष्ट केले. त्यांच्या कष्टाला फळ आल्याने समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया नरहरी गोरे यांनी दिली.