नांदेड - मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा परिसरात सुरू असलेले गावठी दारूचे 13 अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केले. या अड्ड्यांमधून 12 हजार 800 लिटर असे तीन लाख रुपयांचे रसायन आणि एक दुचाकी जप्त केली आहे. दोन आरोपींना अटक केली असून 11 गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत.
देशी व विदेशी दारूची दुकाने लॉकडाऊनमुळे बंद असल्याने मद्यपींनी आपला मोर्चा गावठी दारुकडे वळविला आहे. अशा परिस्थितीत गावठी दारुला वाढती मागणी लक्षात घेऊन गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथक नेमून अशा अवैध दारुवर कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी टाकलेल्या छाप्यांमध्ये एकूण 13 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व परिसर मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा भागात आहेत.
या प्रकरणात 13 गुन्हे दाखल केले असून, 12 हजार 800 लिटर रसायन आणि एक दुचाकी जप्त केली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोलीचे निरीक्षक एस.एस. खंडेराय, भरारी पथकाचे निरीक्षक पी. ए. मुळे, किनवटचे निरीक्षक एस. एम. बोधमवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.