नांदेड- नांदेडमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१च्या बांधणीचे काम अगदी संथ गतीने चालू आहे. त्यामुळे वारसगांव ते राहटीदरम्यान प्रवास करणे अवघड झाले आहे. रस्ता बांधणीचे काम जलद गतीने करावे तसेच बिदर रेल्वेच्या मार्गाच्या कामाची पिंक बुकमध्ये नोंदणी करून गती द्यावी, अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी लोकसभेत केली.
प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आज शून्य काळात बोलण्याची संधी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी दिली होती. त्यांनी आपले म्हणणे अगदी थोडक्यात लोकसभेत मांडले. या रस्त्याच्या कामाला गती मिळावी म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर सातत्याने प्रयत्न करत आहेत. नांदेड ते बिदर या रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने दोन हजार १५२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र याचा उल्लेख पिंक बुकमध्ये करण्यात आला नाही. या कामाचा उल्लेख पिंक बुकमध्ये करावा आणि तातडीने रक्कम द्यावी. तसेच नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी जलद गतीने काम सुरू करावे, अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी केली.