नांदेड - देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे हातवर पोट असलेले लोक, मजूर, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळेच मुक्रमाबाद (ता.मुखेड) येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी बोधने यांनी शहरातील गरजू कुटुंबाना पाचशे रुपये रोख रक्कम अर्थसाह्य दिले आहे. त्यांनी एकुण सातशे कुटुंबाना ही मदत दिली.
मुखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते बालाजी बोधने यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील ज्या लोकांचे हातावर पोट आहे, अशा गरजू कुटुंबाना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे मदत दिली. कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन केले असून महाराष्ट्रात ही संचारबंदी लागू केली आहे. या टाळेबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे छोटे मोठे कामगार मजूर व हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे देशासहीत महाराष्ट्रात ही फार मोठे आर्थिक संकट उभा राहीले आहे. अशा कठिण परिस्थितीत नागरीक केंद्र व राज्य सरकारने दिलेले आदेश पालन करत घरीच राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करत आहेत. अशा या जागतिक महामारीच्या सकंटाचा सामना करत असलेल्या हातावर पोट असलेल्या गरजू लोकांना आर्थिक मदत करुन बालाजी बोधने हे सामाजिक बांधिलकी जपत जवळपास सातशे गरजू कुटुंबाना घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला पाचशे प्रमाणे मदत दिली आहे.
उल्लेखनीय म्हणजे काही दिवसापूर्वीच बालाजी बोधने यांनी आपल्या अशापुरक बोधने या मुलीच्या वाढदिवसावर होणारा अनाठायी खर्च टाळून पंतप्रधान साहय्यता निधीला एक्कावन हजार रुपयांचा धनादेश नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे सुपुर्द केला. कांही गरजूंना कुटुंबाना अन्नधान्य ही वाटप केले होते.
यापुढेही अशी सेवा देत त्यांनी शहरातील पोलीस कर्मचारी, महसुल कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासाठी मोफत जेवनाची व्यवस्था केली आहे. यासाठी त्यांच्या सोबत मित्र परिवार सदाशीव बोयवार, शशीकांत तेलंग, लालु बोयवार, बालाजी टेकाळे, अशोक लोणीकर, रज्जाक कुरेशी आदीनी परिश्रम घेत आहेत.