नांदेड - लॉकडाऊन असल्याने गोरगरीब जनतेच्या पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थी व कामगार वर्ग अडकून पडला आहे. भोजनालय तसेच हॉटेल बंद असल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. काही अन्नदात्यांमुळे त्यांच्या एक वेळच्या जेवणाची सोय होत आहे. पण रात्री मात्र उपाशीपोटीच झोपावे लागत आहे.
नांदेड शहरात तेलंगाणा, तामिळनाडू या राज्यातील विद्यार्थी व कामगारांची सामाजिक कार्यकर्ते दीपक पावडे यांच्या पुढाकाराने मदत करण्यात आली आहे. गॅस सिलिंडर, शेगडी व राशनची व्यवस्था त्यांना करून देण्यात आली. शहरातील तेलंगणा, तामिळनाडू राज्यातील कामगार व विद्यार्थी यांची विचारपूस केली असता, ते मागील काही दिवसापासून एक वेळच्या जेवणावर पुर्ण दिवस काढत असल्याचे समोर आले.
रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्याकडे कोणतेही साहित्य उपलब्ध नव्हते. हे निदर्शनास आले व भाजपचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पावडे यांनी लगेचच मित्राच्या मदतीने त्यांना मदत केली. या कामगारांना गॅस सिलिंडर व शेगडीची व्यवस्था करून त्यांना पुढील काही दिवस पुरेल इतक्या राशनची व्यवस्था करून दिली. यासोबतच रोज एक वेळ पुरेल इतके जेवणाचेही आयोजन अन्नछत्र परिवार यांच्यामार्फत करण्यात आले. तर, पुनित बरारा यांच्यामार्फत गॅस सिलिंडर, शेगडी देण्यात आली.