नांदेड - लातूर-नांदेड महामार्गावरील खड्डे या विषयावरीन शिवसेना आक्रमक झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात घुसून मुंडण आंदोलन केले. यावेळी बराच वेळ शिवसैनिक कार्यालयात ठाण मांडून बसले होते.
लातूर-नांदेड महामार्ग सध्या खड्ड्यांनी भरलेला आहे. या रस्त्यापुढे गावातील रस्ते बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे. खराब रस्त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अनेक अपघात झाले आहेत. या अनेक जणांचा जीव गेल्याचा घटनाही घडल्या आहेत. सद्यस्थिती पाहिल्यास त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. त्यात आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. यामुळे हे खड्डे आणखी धोकादायक बनले आहेत.
या रस्त्यावरील खड्डे लवकर बुजवावेत, या मागणीसाठी लोहा येथील शिवसेनेच्या कार्यकर्तांनी आंदोलन केले. त्यांनी नांदेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग कार्यालय गाठले आणि तिथे घोषणाबाजी केली. यादरम्यान, शिवसैनिकांच्या मागणीची दखल घेण्यासाठी एकही अधिकारी समोर आला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कार्यालयातच ठाण मांडून मुंडण आंदोलन करून निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
हेही वाचा - वांद्रेतील भाभा रुग्णालयात कोरोना रूग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न
हेही वाचा - नांदेडची केळी सातासमुद्रापार, जिल्ह्यातून पहिल्यांदा इराणला होतेय निर्यात