नांदेड - डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती होते. आज दुपारी एकच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
महाराजांच्या निधनाची बातमी पसरताच भक्तांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाने परिसरात चोख बंदोबस्त ठेवला असून परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. त्यांचे पार्थिव शासकीय रुग्णवाहिकेने अहमदपूर येथील भक्तीस्थळाकडे रवाना झाले आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यातच डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची प्रकृती खालावली होती. त्यांना नांदेड येथील नारायण सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली होती. मात्र, सोमवारी अचानक प्रकृती खालावली. त्यातच आज दुपारी शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे उपचारादरम्यान निधन झाल्याचे डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी जाहीर केले. त्यानंतर रुग्णालय परिसरात भक्तांची चांगलीच गर्दी जमली होती. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे पार्थिव नांदेड येथून अहमदपूर येथील भक्ती स्थळाकडे रुग्णवाहिकेने रवाना झाले आहे. प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू असून पोलिसांकडून भक्तांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा- दोन दुचाकींची समोरासमोर धडक, चौघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी